रविवार, २८ जुलै, २०१९

 

प्रवास मंथन

जवळपास गेली २४ तास किंवा जास्तच वेळ झाला सलग पाऊस पडतोय, तोही भयानक किंवा आपण ज्याला राक्षसी म्हणू ना अगदी तसा..म्हणजे मुंबई साठी हे काय नवीन नाहीये. पावसानं हवं तसं यावं, वाटेल तितक्या वेळ पडावं आणि प्रत्येक मुंबईकराने "हे साला काय नवीन नाय आमच्यासाठी" असं म्हणून पुढे जात रहावं असो..
तर मुद्दा असा की एका बाजूला मुंबईत गेल्या २४ - २५ तासांमध्ये जवळपास २८०मिमी पाऊस पडलाय..आणि दुसऱ्या बाजूला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर जिल्हा या दोन्हीकडे मिळून गेल्या 12 महिन्यात सरासरी पाऊस २५० पेक्षाही कमी पडलाय...
एकूण पाहता निसर्गाचं पावसाच्या बाबतीतलं गणित चुकल्यासारखं वाटतं..किंवा असं म्हणू शकतो की काही प्रमात आपण ते चुकवलय.
आणि एवढं सगळं होत असताना देखील काही अपवाद वगळता अजुन कुणाला जाग आलीय असं तरी दिसत नाहीये. म्हणजे आपलं एकच काम, एकतर निसर्गाला तरी दोष द्यायचा नाहीतर सरकारला तरी दोष द्यायचा. त्याचं फलित काय मिळतं, तर शून्य.
माझ्या वाचनात असाही आलंय की ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या २०-२५ वर्षामध्ये मराठवाड्याचा वाळवंट होईल आणि त्याला पूर्ववत करायला जवळपास पुढची शंभरेक वर्षे तरी लागतील. यावरून ही परिस्तिथी किती गंभीर आहे हे लक्षात येईल.

एक गोष्ट मान्य की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग हे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतात पण तरी आताची परिस्थिती गेल्या १० वर्षांपेक्षा तर खूपच वाईट झालीय.. वातावरण बदलामुळे म्हणा किंवा अनिर्बंध पाणी उपसा असो किंवा अतोनात पाण्याचा अपव्यय म्हणा यामुळं भूजलपातळी जवळपास संपलीय (नुकत्याच चेन्नई बाबतच्या बातम्याही वाचलेल्या). कधी कधी भीती वाटायला लागते की खरंच हे जे ऐकतोय ते खरं तर होणार नाही ना..आणि आजूबाजूचे लोक जसे वागतात ते पाहून तर त्याला अजुनच बळ मिळायला लागतं.

पण खरंच परिस्थिती अजूनही एवढी हाताबाहेर गेलेली नाही आपण अजूनही सावरू शकतो याला प्रचंड अशी वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती लागेल. मी स्वतः पासूनच सुरुवात केलीय.  या परिस्तिथी बदलासाठी मला जे शक्य होतं ते मी करतो. एक गोष्ट लक्षात आलीय की उपदेश करण्याने काही बदलत नाही त्यापेक्षा आपणहून सुरुवात करावी म्हणून केली. ज्याला ज्यावेळी परिस्थितीची झळ पोचेल तो त्यावेळी सुरूवात करेल आपल्याला उमगली तर आपण वेळ का दवडायचा..आपण चालत राहायचं.

तसं तर माझं गाव सोलापूर, आणि सध्या मी मुंबईत राहतो त्यामुळं दोन्हीकडची परिस्तिथी पाहिलीय मी. सध्या मुंबई पुणे प्रवासात आहे..एका बाजूला दरीत कोसळणारा राक्षसी पाऊस आणि दुसऱ्या बाजूला असंख्य पाऊसवाटांनी अमानवीय कातळाच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि मध्ये मुठीत जीव धरून बसलेला मी आणि अजुन कितीतरी जीव. अशा वेळेस लिहावस वाटतं म्हणून लिहिलं.
हे वाचून एखाद्याच्या विचाराला किंचीतजरी चालना मिळाली तर मी ते माझ्या लेखणी चं फलित समजेन.
रजा घेतो, भेटू पुन्हा अशाच प्रवासातल्या कुठल्या तरी टप्प्यावर.

तळटीप - माझा या विषयावरचा एवढा अभ्यास नाही पण जे वाचनात येतं, ऐकतो किंवा पहातो त्यावरून माझी मत बनतात. ही सर्वस्वी माझी मतं आहेत तुमच्या दृष्टिकोनातून ती वेगळी ही असू शकतात.

- संदेश मुळे
#सोलापूरकर_मुंबई_पुणे_प्रवासात

Share:
 

असंख्य चेहऱ्याची माणसं


सुट्टीचा दिवस घरी उकडत होतं म्हणून जवळच्याच मॉल मध्ये गेलो होतो, एरवी लहान आणि किराणा व्यवसायिकांच्या व्यवसायावर मॉल संस्कृतीने येणारं संकट बऱ्याच अंशी खरं असलं तरी मॉल मध्ये आल्यावर त्या गोष्टीचा विसर पडतो हे मात्र नक्की,
पण मॉल मध्ये आल्यावर एक गोष्ट मात्र प्रकर्षांने जाणवायला लागते ती म्हणजे पूर्वीची* पारदर्शक माणसं आता चेहऱ्यावरचे मुखवटे आणि दिखाउपणेचे रंग लावल्यामुळे अपारदर्शक होत चाललियत...
आता कुणी कसं वागायचं, कसं राहायचं याचे उपदेश मी कुणाला देत नाहीये, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तेवढा व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार घटनेनं सगळ्यांनाच दिलेला आहे, अगदी मलाही.
पण सामन्यात: माणूस जेवढा judgemental असतो मिहि तेवाढच सामान्य आहे..फक्त माझं व्यक्त होणं मला थांबवत नाही म्हणून मी लिहितो. याचा अर्थ मी बरोबरच असेन असाही नाही.
तर मूळ मुद्द्यावर परत येतो,
तर मला चेहरे पहायची आवड आहे, प्रत्येकाचे चेहरे न्याहाळायला भारी वाटतं (अर्थात एकटं फिरताना हे विनासायास शक्य होतं एवढंच). म्हणजे वेळही जातो आणि लोकांची व्हरायटी ही कळते, फिरताना सहज चेहरे पाहिलं की मग काही जोडपी** दिसतात, काही एकटे दुकटे, काही झुंडीने फिरणारे प्राणीही असतात. हवसे-गवसे-नवसे सगळे प्रकार इथे पाहायला मिळतील, आधी आम्ही वर्षाच्या गावजत्रेत आणि लग्नताच असे लोक पाहिलेले...
प्रत्येकाचा चेहरा काहीतरी गोष्ट सांगत असतो..काही खऱ्या काही खोट्या काही आपल्या काही ढापलेल्या, फक्त त्या वाचता आल्या की मग मजा येते...
एखाद्याचा चेहरा पाहून आपण आपली गोष्ट बनवायची..ती त्यांच्याशी किती सुसंगत असेल माहीत नाही..आपण आपले अंदाज बांधायचे.
पण एवढं आहे जेवढे काही चेहरे न्याहाळले ना त्यातले कितीतरी जण उत्तम अभिनय करणारे होते..आनंदाचा अभिनय, हसायचा अभिनय...एवढंच काय तर मोठेपणाचा पण अभिनय...
मुखवट्यांचं जग झालाय सगळं..क्षणाक्षणाला वेगवेगळ्या मुखवट्यांचे चेहरे, असंख्य चेहऱ्यांची गर्दी, आणि गर्दीतली असंख्य चेहऱ्याची माणसं..

तळटीप - मी जेवढा सामान्यपणे judgemental होतो तेवढे तुम्हीही हे वाचून व्हाल ही अपेक्षा.

संदर्भ -
*पूर्वीची - पूर्वीची म्हणजे आम्हा ९० च्या दशकात जन्माला आलेल्या मुलामुलींनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या भारतातील उत्क्रांतीच्या सुरुवातीपासून ते आज त्याच्या एक परमोच्च क्षणी पोहोचलेल्या संस्कृतीबदलाच्या प्रवाहापूर्वीची, सोबतची आणि नंतरची माणसं पहिली आहेत आणि त्यावरून जेवढं आकलन झालंय त्याच्या जोरावर 'पूर्वीची' असं लिहिलंय.
आणि अजून एक भारत पूर्वीपासूनच विज्ञाननिष्ठ आहे..फक्त मधला काही काळ कर्मठपणाच्या जोखडामध्ये अडकून पडलेला म्हणून ९० नंतरचा काळ हा विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीचा म्हणलोय उगमाचा नाही.

** जोडपी - यात लग्न झालेली, न झालेली, काही रिकामी काही लेकरा बाळांसाहित, काही जुन झालेली काही नवीन आशा सर्व जोडप्यांच्या समावेश होतो.

Share:

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

 

शिलंगण

(भारताबाहेर जायचा जरी योग आला नसला तरी) जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी असलो तरी कोणताही सण आला कि घरची ओढ लागतेच, आणि दसरा(विजयादशमी) असली म्हणजे जरा जास्तच.
आमच्या गावातला दसरा त्यातल्या त्यात खूपच अलौकिक आणि आत्मीय आनंद देणारा असतो, त्याचं कारणही तसंच आहे. आमच्या कडे कसं असतं कि गावातल्या मोठ्या मैदानावर आपट्याच्या पानांची मोठी पेंडी ठेवलेली असते. त्याला गावाचे पाटील किंवा प्रतिष्ठित व्यक्ती ती पेंडी तलवारीनं तोडतात आणि गावातील सगळ्या लहान मोठ्या व्यक्ती ते सोनं लुटून घेतात त्यात मी ही असतो.
हि सोनं लुटायची अशी परंपरा जरी असली तरी माझे बाबा सांगतात कि पूर्वी ते सोनं गावाच्या ईशान्य दिशेला शिवेवर ठेवलेलं असे आणि ते घोड्यावर जाऊन लुटून आणलं जात होतं.
याच बरोबर तिथे गावातल्या वेगवेगळ्या देवांच्या पालख्या एकत्र जमा होतात. मग सगळे जण सगळ्या पालख्यांचे दर्शन घेऊन एकमेकांना सोनं देतात. जे समवयस्क असतात ते एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना रामराम म्हणतात,वयानं लहान लोक मोठ्यांच्या पाया पडून त्यांना सोनं देतात. वर्षभर ज्यांचे चेहरे हि पाहायला मिळत नाहीत किंवा जे परगावी राहतात ते सारे तिथे भेटतात, त्या सगळ्या लोकांसोबत आणि पालख्यांसोबत गावातल्या सगळ्या देवळात फिरून साऱ्या देवांना सोनं द्यायचं त्यानंतर विजयी मुद्रेनं घरी आलं कि  कुठलीशी लढाई जिंकून घरी आल्याच्या आनंदात औक्षण करून घ्यायचं.
आणि पोशाखा  बद्दल सांगायचं राहिलं कुठलाही पारंपरिक पोशाख घालायचा सोबत टोपी घालायची आणि त्या टोपीमध्ये घरच्या घटामधील धांन्याची छोटी रोपं तुरे म्हणून  खोवायची.
हेच सारं आमचं सीमोल्लंघन आणि हेच शिलंगण.
या सर्वाहून दुसरा आनंद तो काय असेल, शहरात या परंपरा नाही जपल्या जात मुळात असं काही असतं याची कल्पनाही शहरातल्या लोकांना नसते त्यांच्यासाठी असे सण म्हणजे चित्रपटात दाखवलेली प्रतीकात्मक कल्पना. त्यातल्या त्यात मी ज्या शहरामध्ये राहतो सोलापुरात(एक असं शहर ज्याने जागतिकीकरणाच्या बदलत्या काळातही स्वतः इथल्या परंपरा जपल्या आहेत) तिथे अजूनही ह्या परंपरा जपल्या जातात त्याबद्दल सविस्तर लिहीन नंतर केंव्हातरी. सध्या हे सारं वर्णन माझ्या गावाचं आहे कासेगावचं. 

तळटीप  -  वर उल्लेखलेली सोनं हि संज्ञा आपट्याच्या पानाला दिलेली आहे.
Share:

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

 

पत्र


मनाच्या आचारसंहितेत, शब्दांना हाताशी धरून भावनांनी बंडखोरी केली. अभ्रकासारख्या पांढऱ्याशुभ्र कागदावर रक्तरंजित आंदोलनं केली. वाळूत पाऊलांचे ठसे उमटावेत तशी अभ्रकावर चित्रविचित्र पण एकसंध नक्षी तयार झाली, भावनांच्या आणि शब्दांच्या पाउलांची.
मी आभाळभरून प्रयत्न केले तरी भावनांची बंडखोरी मोडणं मला शक्य झालं नाही, पण मी प्रयत्न सोडले नाहीत आणि त्यातच त्यांच्या बंडखोरीला जुन्या आठवणींची नवी कुमक मिळाली.
या द्वंद्वातच माझा पराभव झाला आणि या साऱ्यांची साक्ष असलेला तो इवलासा अभ्रकाचा तुकडा, तिच्यासाठी लिहिलेलं "पत्र" झालं.
जे कि तिने दिलेल्या डायरीत, तिनेच लिहिलेल्या त्या एका पानाच्या मागे अजुनही पत्त्याविना तसेच आहे आणि माझ्यानंतरही अनंतकाळापर्यंत तसेच राहील.


©संदेश मुळे
Share:

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

 

कृष्णविवरा सारखे शून्य

कसं होतं, आपल्या आयुष्यात खूप सारे प्रसंग, खूप साऱ्या गोष्टी घडुन गेलेल्या असतात, भले त्या चांगल्या असो किंवा वाईट. तेवढ्यापुरतं त्या गोष्टीचा आनंद किंवा दुःख होतं, नंतर आपण ती गोष्ट विसरून हि जातो, पण तरी आपल्या सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं, जर आपल्या वर्तमानात त्या इतिहास जमा गोष्टी आठवल्या तरी त्याचं एवढं काही वाटत नाही. फक्त हे सगळे प्रसंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रंगीबेरंगी माञ वाटतात हे नक्की. 
त्यातच कधीतरी (म्हणजे वर्तमानात!!) तुम्हाला काहीतरी महत्वाचं समजतं, जे कि तुम्हाला माहित असायला हवं असतं पण माहित नसतं, किंवा सभोवतालच्या पंचमहाभूतांनी ते जाणून बुजून तुमच्या पासून लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यात तुम्हाला या नव्याने कळलेल्या गोष्टीचा रंग आणि आधी माहित असणाऱ्या साऱ्या गोष्टींचा रंग यात साम्य वाटायला लागतं. 
तुम्ही मग हि नवीन गोष्ट मध्यवर्ती ठिकाणी ठेवून बाकीच्या गोष्टी त्याला रंगसंगतीनुसार जोडायचा प्रयत्न करता आणि त्याचा “रुबिक क्युब” होतो, तोही एकसंध रंग-संगती नसलेला आणि सुरु होते शर्यत तुमच्या कल्पनाशक्ती आणि आकलन शक्तीची. 
अथक परिश्रमानंतर जेंव्हा हि शर्यत संपते. तेंव्हा रंगसंगतीनुसार एकसंध जोडलेल्या प्रसंगांचा “रुबिक क्युब” तुमच्या हातात असतो. जेंव्हा हे सारं कोडं सुटून त्या गोष्टींचं आकलन होतं तेंव्हा तुम्हाला हसावं कि रडावं तेच कळत नाही. स्वतःची किव यायला लागते. पण तुम्ही काहीच करू शकत नाही कारण तुम्ही शून्य झालेले असता, कृष्णविवरा सारखे शून्य. 


©संदेश मुळे
Share:

शनिवार, ८ जुलै, २०१७

 

#काहीबाही ६ - खजिना


परवा मिळाले काही,
पुसट झालेल्या अक्षरांचे निनावी कागद,
झिरझीर झालेली जाळीदार पिंपळपानं,
काटे नसलेला पण दरवळणारा तो गुलाब,
तो शाईपेन आणि एकंच पान लिहिलेली डायरी,
त्यातलेही काही शब्द कसल्याश्या पाण्याने पुसटलेले,
आणि एका पुरचुंडीत बांधलेले क्षणही सापडले
अबोल्याचे, रुसव्याचे, प्रेमाचे, ओढीचे,
काही तुझे, काही माझे
सारे एकमेकांना घट्ट बिलगून बसलेले.
खूप काही सापडलं आणि वाटलं हाच तो
मी ना शोधलेला पण अनाहूतपणे सापडलेला #खजिना,
प्रत्येकाला किमान एकदा तरी घराच्या किंवा
मनाच्या अडगळीत सापडतोच असा.

©संदेश मुळे

Share:

सोमवार, १९ जून, २०१७

 

#काहीबाही ५ - आयुष्य कुठे घेऊन चाललंय देव जाणे...

आयुष्य कुठे घेऊन चाललंय देव जाणे...

"विस्कटून विखुरलेल्या आयुष्याला वेचता वेचता दमछाक व्हावी, विस्मरणात गेलेले काळजाचे ठोके चुकवणारे आठवणींचे दुवे सापडावेत आणि दुव्याला लागून अजून काही दुवे हातात यावेत...अनंतकाळापर्यंत हाच खेळ चालत राहावा त्यात त्या करत्या करावीत्याने माझ्या भाबडेपणावर गालातल्या गालात हसून हलकेच फुंकर घालून गोळा केलेले सारे क्षण पुन्हा विखरून टाकावेत.....म्हणजे समुद्रकिनार्याची वाळू घट्ट मुठीत पकडून पाण्यात उभारल्या सारखा वाटेल....वाळू मुठीत कितीही घट्ट पकडली तरी ती निसटणारच आणि तो फेसाळलेल्या समुद्राने पुन्हा त्याच निर्मिकासारखे निर्विकार हसावे. मग मीही आभाळाकडे पाहून हलकंसं हसूनच मनातल्या मनात त्याला म्हणावं तू काहीही केलंस तरी मी सुद्धा हरणाऱ्यातला नाही, शेवटी मीही तुझीच निर्मिती आहे."


हे असले विचार यायला लागतात म्हणूनच वाटतं आयुष्य कुठे घेऊन चाललंय देव जाणे...

#काहीबाही #NightThought
©संदेश मुळे

Share: